आयपीएल: मुंबई-चेन्नई एक्सप्रेस रद्द…?

नमस्कार वाचकहो,

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२२च्या या नव्या हंगामात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा आयपीएल मध्ये दहा संघ खेळताना दिसले. हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे गुजरात आणि लखनऊ संघांनी पदार्पणाच्या मोसमात चांगली सुरुवात केली आहे.


तर दुसरी गोष्ट ही की, माझ्या बरोबर आणखी खूप जणांना याचे आश्चर्य वाटले असेलच… ती म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांची निराशाजनक सुरुवात. या संघांचे चाहते जरा अधिकच रुसलेले असतील. असो… यामध्ये आश्चर्यचकित करणारी बाब अशी की, या आयपीएलचे संपूर्ण सामने मुंबई आणि पुण्यात होत आहेत. मला वाटले हे या दोन्ही संघांसाठी लकी आहे. एक तर मुंबई संघासाठी घरगुती मैदान आणि चेन्नईसाठी (तो संघ कुठेही चांगलीच कामगिरी बजावतो). मात्र झाले वेगळेच घरगुती मैदानावर एकही सामने न जिंकता आल्याने पाच वेळेचा आयपीएल विजेता मुंबई संघ गुणतालिकेत तळाला आहे (पहिल्या सहा सामन्यानंतर). तर दुसरीकडे माजी विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज नवखा कर्णधार रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली अपयशी होताना दिसत आहे.

सध्याच्या हंगामात तीस पेक्षा अधिक सामने खेळले गेले असून म्हणजे पहिले सत्र पूर्ण होत आले आहे. चेन्नईच्या खात्यात एक विजय आहे (नेहमीप्रमाणे बेंगलोर विरुद्ध) तर मुंबई संघाची पाटी मात्र कोरीच आहे. यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये या दोन्ही संघांची कामगिरी कशी असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

मागील हंगामात चेन्नईने दुबई येथे दुसरे सत्र खेळताना आयपीएलचा चौथा किताब पटकावला होता. त्यावेळी त्यांचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसी भलतेच फॉर्ममध्ये होते. फाफने तर अंतिम सामन्यात ५९ चेंडूमध्ये ८६ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. आयपीएल२०२२च्या लिलावात बेंगलोरने फाफला ७ कोटी रुपयांना संघात विकत घेतले. बेंगलोरचे नेतृत्व करत त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये २५० धावा केल्या आहेत. तर आयपीएल २०२१चा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराजची बॅट मात्र शांत आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ०, १, १, १६, १७ आणि ७३ धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्यातील त्याचा धावा करण्याचा वेग असाच कायम राहिल्यास चेन्नईसाठी उर्वरित हंगामात जमेची बाजू ठरेल. ख्रिस जॉर्डनची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीही चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर नवखा गोलंदाज महिश थिकक्षणा याने आयपीएलमध्ये चांगले पदार्पण केले आहे. या श्रीलंकन खेळाडूने तीन सामने खेळत सहा पैकी चार विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेतल्याआहेत.

त्याचबरोबर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यालाही फलंदाजीत लय सापडत नसून त्याचा साथीदार ईशान किशननेही पहिल्या दोन सामन्यांत नाबाद ८१ आणि ५४ धावांची खेळी करत संघाला उत्तम सुरुवात करून दिली होती पण बाकीच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फार कमी धावा निघाल्या. स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड देखील अपयशी होताना दिसत आहे. तर गोलंदाजीमध्ये प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराहला पण चार सामन्यांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. संघ १५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष विरोधी संघांसमोर ठेवत असला तरी त्यांची गोलंदाजी सुमार होत आहे.

PC: IPL

२१ एप्रिलला होणाऱ्या क्रिकेटचा ‘एलक्लासिको’ म्हणजेच मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. २०२०च्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाने अशीच सहा पैकी पाच सामने गमावले होते. त्यावेळी ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. तर मुंबईचा सध्या सहा सामन्यांमध्ये पराभव झाला असून प्रथमच त्यांची अशी वाईट सुरुवात झाली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात कोणताच संघ सलग सात सामन्यांमध्ये पराभूत झाला नसून हा विक्रम आपल्या नावे न करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असून तो अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

Pranali K

४ मार्च, २०२२…

नुकताच मोबाईल अनलॉक केला होता… वर आलेले नोटिफिकेशन वाचून मन एकदम विषण्ण झाले… बातमी खरी आहे का हे तपासून पाहण्यासाठी ट्विटर देखील ओपन करता येत नव्हते…त्यावेळी तोंडातून जोरात मम्मी अशी हाक बाहेर पडली… तिकडून मम्मी विचारते काय झाले?… मी ,”अग, शेन वॉर्न गेला”…

आधीच १००वी कसोटी खेळणारा विराट कोहली आणि ९६ धावांवर रिषभ पंत हे बाद झाल्याने उदास झाले होते. हे काय कमी होते का त्यातच मनाला चटका लावून जाणारी एक बातमी त्या नोटिफिकेशन मधून कळाली… फिरकीचा जादूगार अर्थातच ऑस्ट्रेलिया संघाचा महान गोलंदाज शेन वॉर्नची या जगातून अचानक एक्झिट. या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्व,चाहते हळहळले.

Twitter: CSK

लेगस्पिनचा बादशहा असलेल्या वॉर्नचे ‘द बॉल ऑफ सेंच्युरी’, सचिन तेंडुलकरला आऊट केलेले, ऍशेसमध्ये त्याने घेतलेले काही अप्रतिम विकेट्स असे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत.

जेव्हा क्रिकेट मला समजायला लागले तेव्हा वॉर्नला फार कमी वर्षेच आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहिले. यामुळे त्याचे जास्त क्रिकेट पाहायला मिळणार नाही असे वाटले होते. मात्र नंतर आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आल्याने एक क्रिकेट चाहती म्हणून लकी ठरले.

त्याकाळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंची एक वेगळीच प्रतिमा भारतीय चाहत्यांच्या डोक्यात होती. त्यातच १९९२च्या काळात एक ब्लॉण्ड रंगाचे केस, कानात खडा घातलेला तो एक गोलंदाज ज्याने भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटचा देव असणाऱ्या तेंडुलकरला तर वॉर्नने मैदानात फार त्रास दिला असला तरी भारतीय चाहते देखील त्याच्या गोलंदाजीची वाहवा करतातच.

पदार्पणाच्या त्या कसोटी सामन्यात वॉर्नने एकही चेंडू टाकला नव्हता. तर पुढे जाऊन कसोटीमध्ये जलद ७०० विकेट्स घेणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला होता. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००१ विकेट्स घेणाऱ्या वॉर्निने त्याच्या अफलातून बॉलिंगने त्याच्या संघ सहकाऱ्यांना तर आश्चर्यचकित केले होतेच त्याचबरोबर विरोधी संघ देखील त्याच्या बॉलिंगचा दिवाना झाला.

वॉर्नच्या फिरकीमुळे अनेकांनी ‘मला त्याच्या सारखाच गोलंदाज व्हायचा आहे’ असे ठरवले. एकाच वर्षात कसोटीमध्ये ९६ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा देखील तो एकमेव गोलंदाज आहे.

Pranali K.

मध्यप्रदेशच्या ‘अय्यर’ची पहिल्याच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी

आयपीएल२०२१च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी पराभूत करत कोलकाताचे तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले.

कोलकाता या आयपीएलमध्ये पराभूत झाला असला तरी वेंकटेश अय्यर या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. चेन्नईने अंतिम सामन्यात  कोलकाता समोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेंकटेशने शुबमन गिल  सोबत ताबडतोब फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १०.४ षटकामध्ये ९१ धावांची भागीदारी केली. यावेळी त्याने जोश हॅझेलवूड, रवींद्र जडेजा, ब्रावो, शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना त्याने चांगले प्रत्युत्तर देत अर्धशतक केले. त्यांनतर मात्र कोलकाताचा संघ ढासळतच गेला.

दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाताने दिल्लीला ३ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या विजयामध्येही वेंकटेशने त्याच्या अटॅकिंग फलंदाजीने तुफानी ५५ धावा करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

या अष्टपैलू खेळाडूने २०२१च्या आयपीएलमध्ये १० सामन्यात चार अर्धशतकासह ३७० धावा करत ३ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ३७ चौकार आणि १४ षटकार लगावले आहेत. मध्यप्रदेशच्या या खेळाडूचा टी२० प्रकारातील स्ट्राइक रेट १३३.५० एवढा तर इकॉनॉमी रेट सातपर्यत असल्याने कोलकाताने त्याला आयपीएल२०२१साठी असलेल्या लिलावामध्ये संघात घेतले. त्यानंतर वेंकटेशने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाब विरुद्ध १९८ धावा करत २ विकेट्स पण घेत आपण आयपीएलसाठी तयार आहोत हे दाखवून दिले.

करीयरच्या सुरुवातीला वेंकटेश मध्यम फळीत फलंदाजीला करत होता. मात्र त्याच्या प्रशिक्षकाने त्याची फटकेबाजीची शैली बघून त्याला मर्यादित षटकाच्या सामन्यासाठी सलामीला येण्यास तयार राहा असे सांगितले. नंतर त्याने २०२१च्या विजय हजारे ट्रॉफी आणि सईद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धांच्या काही  सामन्यात सलामीला येत फलंदाजी केली. यावेळी त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत अनेक चेंडू सीमारेषेपार पाठविले.

आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच या डावखुऱ्या फलंदाजाने बेंगलोर विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येताना नाबाद ४१ धावा केल्या. या सामन्यात त्याचे एक्सट्रा कव्हर ड्राईव्ह शॉट्स, बॅकफूटवर चांगले नियंत्रण बघायला मिळाले. कायले जॅमिसनला मारलेला तो उत्तुंग षटकार आणि हसरंगा याच्या गोलंदाजीवरही त्याने चांगली फटकेबाजी केली.

फलंदाजी करताना सुरुवातीला चेंडू बघून त्याप्रकारे बॅट आणि हात वळवण्यात वेंकटेश पटाईत आहे. अशीच फलंदाजी त्याने दिल्ली विरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात केली. कगीसो रबाडासाठी हा आयपीएल हंगाम काहीसा निराशाजनक ठरला आहे. तरीही शेवटी तो आतंरराष्ट्रीय स्तरावरचा गोलंदाज पण यालाही वेंकटेशने चौकार-षटकार लगावत उत्तम फलंदाजी केली. त्याचबरोबर शुबमन गिलसोबत सलामीला येत आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान यांच्या गोलंदाजीचाही चांगला समाचार घेतला.

२६ वर्षीय या मध्यमगती वेगवान गोलंदाजाला येणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये नेट बॉलर म्हणून निवडले आहे. त्याने लीग सामन्यात दिल्ली विरुद्ध गोलंदाजी करत ४ षटकात २९ धावा देत २ विकेट्स पटकावल्या. यावेळी स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला बाद करत आयपीएल करीयरमधील पहिली विकेट घेतली.

PC: twitter/IPL- CSKvKKR

चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेंकटेश अय्यर हे दोघेही युवा सलामीवीर फलंदाज यंदाचे आयपीएल चांगलेच गाजवत आहेत. ऑरेंज कॅप परिधान करणाऱ्या ऋतुराजची ही दुसरी आयपीएल तर वेंकटेशची पहिलीच आयपीएल आहे. मात्र या दोघांनीही त्यांच्या प्रभावशाली फलंदाजीने क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले आहे.

Confused Sports Lover

कोणाला मेस्सी आवडतो तर कोणाला रोनाल्डो….. कोणी प्रीमियर लीगचे फॅन असतात तर कोणाला लालीगा आवडते…..काही स्ट्रायकर, डिफेंडर यांचे चाहते नसतात तर फक्त गोलकीपरचे चाहते असतात…..कारण गोलकीपर सुध्दा गोल करतात (इथे मी ओन गोल म्हणत नाहीये)….काही पेले तर काही मॅरेडोना चे चाहते असतात….काही युरो कपचे फॅन असतात तर काहींना कोपा अमेरिका स्पर्धा आवडते…. काही चेल्सी चे फॅन असतात तर काहींना लिव्हरपूल क्लब किंवा इतर संघ आवडतो…..अजून बरेच काही आहे यात लिहण्यासारखे पण यामध्ये एकच बाब कायम आहे ती ‘फुटबॉल’

चाहत्यांना खेळाडूंबरोबर क्लब, स्पर्धा पण त्यापेक्षा अधिक फुटबॉल खेळ प्रिय असतो मग त्यामध्ये आपला आवडता संघ, खेळाडू पराभूत झाला आपण त्याच्याविषयी अपशब्दांचा उपयोग करतो. हे अगदी चुकीचे आहे.

#सहजसुचलेलं

उताऱ्याची (परेग्राफ) सुरूवात दोन बोटे जागा सोडून करताना जो आनंद होतो तोच विषयाचा (काही) शेवट पूर्णविराम देताना होतो. पण यामध्ये शब्दांबरोबरच स्वल्पविराम, उद्गारवाचक इत्यादींचा योग्य वापर केल्याने आपले लिखाण पूर्ण होते. 🤓✒️📚