नमस्कार वाचकहो,
इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२२च्या या नव्या हंगामात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा आयपीएल मध्ये दहा संघ खेळताना दिसले. हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे गुजरात आणि लखनऊ संघांनी पदार्पणाच्या मोसमात चांगली सुरुवात केली आहे.
तर दुसरी गोष्ट ही की, माझ्या बरोबर आणखी खूप जणांना याचे आश्चर्य वाटले असेलच… ती म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांची निराशाजनक सुरुवात. या संघांचे चाहते जरा अधिकच रुसलेले असतील. असो… यामध्ये आश्चर्यचकित करणारी बाब अशी की, या आयपीएलचे संपूर्ण सामने मुंबई आणि पुण्यात होत आहेत. मला वाटले हे या दोन्ही संघांसाठी लकी आहे. एक तर मुंबई संघासाठी घरगुती मैदान आणि चेन्नईसाठी (तो संघ कुठेही चांगलीच कामगिरी बजावतो). मात्र झाले वेगळेच घरगुती मैदानावर एकही सामने न जिंकता आल्याने पाच वेळेचा आयपीएल विजेता मुंबई संघ गुणतालिकेत तळाला आहे (पहिल्या सहा सामन्यानंतर). तर दुसरीकडे माजी विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज नवखा कर्णधार रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली अपयशी होताना दिसत आहे.
सध्याच्या हंगामात तीस पेक्षा अधिक सामने खेळले गेले असून म्हणजे पहिले सत्र पूर्ण होत आले आहे. चेन्नईच्या खात्यात एक विजय आहे (नेहमीप्रमाणे बेंगलोर विरुद्ध) तर मुंबई संघाची पाटी मात्र कोरीच आहे. यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये या दोन्ही संघांची कामगिरी कशी असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
मागील हंगामात चेन्नईने दुबई येथे दुसरे सत्र खेळताना आयपीएलचा चौथा किताब पटकावला होता. त्यावेळी त्यांचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसी भलतेच फॉर्ममध्ये होते. फाफने तर अंतिम सामन्यात ५९ चेंडूमध्ये ८६ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. आयपीएल२०२२च्या लिलावात बेंगलोरने फाफला ७ कोटी रुपयांना संघात विकत घेतले. बेंगलोरचे नेतृत्व करत त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये २५० धावा केल्या आहेत. तर आयपीएल २०२१चा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराजची बॅट मात्र शांत आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ०, १, १, १६, १७ आणि ७३ धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्यातील त्याचा धावा करण्याचा वेग असाच कायम राहिल्यास चेन्नईसाठी उर्वरित हंगामात जमेची बाजू ठरेल. ख्रिस जॉर्डनची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीही चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर नवखा गोलंदाज महिश थिकक्षणा याने आयपीएलमध्ये चांगले पदार्पण केले आहे. या श्रीलंकन खेळाडूने तीन सामने खेळत सहा पैकी चार विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेतल्याआहेत.
त्याचबरोबर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यालाही फलंदाजीत लय सापडत नसून त्याचा साथीदार ईशान किशननेही पहिल्या दोन सामन्यांत नाबाद ८१ आणि ५४ धावांची खेळी करत संघाला उत्तम सुरुवात करून दिली होती पण बाकीच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फार कमी धावा निघाल्या. स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड देखील अपयशी होताना दिसत आहे. तर गोलंदाजीमध्ये प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराहला पण चार सामन्यांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. संघ १५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष विरोधी संघांसमोर ठेवत असला तरी त्यांची गोलंदाजी सुमार होत आहे.

२१ एप्रिलला होणाऱ्या क्रिकेटचा ‘एलक्लासिको’ म्हणजेच मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. २०२०च्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाने अशीच सहा पैकी पाच सामने गमावले होते. त्यावेळी ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. तर मुंबईचा सध्या सहा सामन्यांमध्ये पराभव झाला असून प्रथमच त्यांची अशी वाईट सुरुवात झाली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात कोणताच संघ सलग सात सामन्यांमध्ये पराभूत झाला नसून हा विक्रम आपल्या नावे न करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असून तो अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
Pranali K